खंडाळे गावात महिला वीज कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ; गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) – खंडाळे गावात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाकडून अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २५ मार्च २०२६ रोजी शिंदी महावितरण कार्यालयातील कर्मचारी सौ. ज्योती शिंपी या खंडाळे गावात एकट्याच वीज बिल वसुलीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी गावातील काशिनाथ बाबुसेठ यांना थकीत वीज बिलाबाबत विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने सर्वांसमोर त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ सहकारी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सध्या मार्च महिन्यात वीज बिल वसुलीचे काम सुरू असल्याने महिला व पुरुष कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन बिल भरण्याची विनंती करत असतात. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, सौ. ज्योती शिंपी यांनी भुसावळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास कॉन्स्टेबल विसपुते व तडवी करत आहेत.

तक्रार दाखल करताना भुसावळ ग्रामीण उपविभागाचे अभियंता श्री. महाजन, शिंदी शाखेचे अभियंता श्री. आखरे, सहकारी कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड यांची भेट घेऊन केली आहे.