भुसावळ (प्रतिनिधी): तालुक्यातील फुलगाव शिवार परिसरात, हॉटेल वेस्टर्न समोरील ‘दस्तक ड्रॉप-इन’ (Dastak Drop-In) या इंधन विक्री केंद्रावर प्रशासनाने मोठी कारवाई करत केंद्र तात्काळ सील केले आहे. सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आकस्मिक तपासणीत उघड झाले.

भुसावळ तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांच्या आदेशानुसार बुधवार, दि. २५ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता शासकीय पथकाने अचानक तपासणी केली. या पथकात पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे सेल ऑफिसर सुरज चव्हाण यांचा समावेश होता.
तपासणीदरम्यान केंद्राचे मालक व प्रतिनिधी नोडे इकबाल अली मोहम्मद (रा. कच्छ) आणि शेख रियाज शेख मासूम (रा. खडका रोड, भुसावळ) यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या.
आढळलेल्या प्रमुख त्रुटी:
परवान्याचा अभाव: केंद्र चालवण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध शासकीय परवाने सादर करण्यात आले नाहीत.
धोकादायक साठवणूक: ज्वलनशील इंधन अत्यंत असुरक्षित पद्धतीने साठवले जात असल्याचे आढळले. आवश्यक ‘पेट्रोलियम परवाना’ (PESO License) उपलब्ध नव्हता.
वजन व मापे नियमांचे उल्लंघन: इंधन नोजलची शेवटची कॅलिब्रेशन तपासणी २०२० मध्ये झाली होती; त्यानंतर नूतनीकरण नाही.
इंधन गुणवत्तेचा प्रश्न: विक्री होत असलेल्या डिझेलच्या गुणवत्तेबाबत कोणतेही अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते.
कागदपत्रांची कमतरता: इंधन खरेदी-विक्री व साठवणुकीसंबंधी कोणतीही अधिकृत नोंद किंवा कागदपत्रे आढळली नाहीत.
या सर्व बाबी सार्वजनिक सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र तात्काळ सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
सदर प्रकरणाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित विभागांकडे पुढील कठोर कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे.


