भुसावळात संदल मिरवणुकीत राडा; चाकू हल्ल्यात चौघे जखमी : परस्परा विरुद्ध गुन्हा दाखल:


भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील घोडेपीर बाबा दर्गा परिसरात संदल मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी होऊन चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांतील चार तरुण जखमी झाले असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. क मार्च) रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दर्गा परिसरात डीजे सुरू असताना काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद चिघळून दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याचदरम्यान काही तरुणांनी चाकूचा वापर केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

या घटनेत हातमजुर अल्पेश मोहम्मद अशरफ शेख (18, रा. जाम मोहल्ला) हा गंभीर जखमी झाला. तो घटनास्थळावरून जात असताना संशयीत अन्य तरुणांवर चाकूचा वार करीत असताना हा वार अल्पेशच्या डाव्या मांडीत आरपार घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.. .

जखमींवर उपचार करण्यात आल्यानंतर अल्पेश शेख यांनी बुधवारी पहाटे बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जावेद गट्टू गवळी (रा. शिवपूर कन्हाळा, ता. भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जुबेर सिराज तडवी करत आहेत.

शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.