तृतीयपंथी समाजाला पारोळ्यात हक्काची दफनभूमी; जिल्हाधिकारी यांचे हस्ते ७/१२ उतारा व आदेशांचे वितरण :

पारोळा (प्रतिनिधी) – समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार असतो. मात्र तृतीयपंथी समाजाची संख्या कमी असल्याने त्यांच्या मूलभूत गरजांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन पारोळा येथील महसूल प्रशासनाने पुढाकार घेत तृतीयपंथी समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीची सोय करून दिली आहे याबाबत .दिनांक २५ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित ७/१२ उतारा व आदेशांचे वितरण जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे हस्ते करण्यात आले.

तृतीयपंथी समाजाने दफनभूमीसाठीची मागणी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्याकडे मांडल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल केली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा ग्राम महसूल अधिकारी निशिकांत पाटील यांना योग्य जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी त्वरीत प्रस्ताव सादर केला.

यानंतर एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी तात्काळ आदेश पारित करून पारोळा शहरात तृतीयपंथी समाजासाठी दफनभूमीसाठी जागा मंजूर केली. दिनांक २५ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित ७/१२ उतारा व आदेशांचे वितरण करण्यात आले.

या निर्णयाबद्दल तृतीयपंथी समाजाने महसूल प्रशासनाचे आभार मानले. “आमचा समाज लहान असला तरी प्रशासनाने आमची दखल घेत न्याय दिला,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रशासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.