चोपडा तालुक्यात धक्कादायक घटना: मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

चोपडा (जळगाव) : तालुक्यातील नारोद येथे एका अत्यंत धक्कादायक घटनेत मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे. घरगुती वाद आणि सततच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.

मृत तरुणाचे नाव रोहन पानचंद पाटील (वय २७) असे असून आरोपी किरण पानचंद पाटील हा त्याचा मोठा भाऊ आहे. २१ मार्च रोजी दुपारी सुमारे १:३० वाजता नारोद येथील गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पायावर गंभीर जखमा दिसून आल्या.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोहन हा व्यसनाधीन झाला होता सतत नशा करून आई-वडील व भावाला शिवीगाळ करत असे. घरात रोज वाद होत असल्याने कुटुंबीय त्रस्त झाले होते. २० मार्चच्या रात्री किरणने रोहनला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर त्याला गुळी नदीच्या पुलावर नेऊन खाली ढकलले. रोहन जखमी अवस्थेत असताना त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान किरणच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्या चेहऱ्यावर जखमा आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणात अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घटनेमुळे नारोद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.