भुसावळ (प्रतिनिधी) :
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रस्तावित असलेला टेक्सटाईल पार्क प्रकल्प नंतर जामनेर येथे हलविण्यात आल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी खंत व्यक्त केली. मात्र, हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर न जाता जळगावमध्येच साकारत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

राज्य अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देण्यासाठी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असला, तरी प्रक्रिया उद्योगांचा अभाव ही मोठी समस्या आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन न होता कच्चा माल बाहेर पाठवावा लागतो. भुसावळ येथे टेक्सटाईल पार्क उभारल्यास रेल्वे व दळणवळणाच्या सोयी, मध्यवर्ती स्थान यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली असती, असे सावकारे यांनी सांगितले.
मात्र, काही प्रशासकीय व स्थानिक कारणांमुळे हा प्रकल्प जामनेर येथे वळविण्यात आला. “भुसावळसाठी मंजूर झालेला प्रकल्प जामनेरला गेला, ही खंत आहे. तरीही तो जिल्ह्यातच होत असल्याने समाधान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
टेक्सटाईल पार्कमुळे जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, वीव्हिंग ते रेडीमेड वस्त्रनिर्मितीपर्यंत संपूर्ण साखळी विकसित होणार असून उत्पादन खर्च कमी होईल. तसेच शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
सावकारे-चौधरी मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासोबत मनोमिलन झाल्याच्या चर्चांवर मंत्री सावकारे यांनी स्पष्टीकरण दिले. “आमचे राजकीय पक्ष वेगळे आहेत. मनोमिलन झालेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला.


