जळगाव – शहरातील जैनाबाद परिसरात केवळ ५०० रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५) असे असून, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने नितीनकडे ५०० रुपये मागितले होते. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात संशयिताने नितीन काळे वर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पोटावर खोल जखमा झाल्याने आतडे बाहेर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, नितीन काळे यांच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
मृताच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, यापूर्वीही संशयिताने वाद घालत नितीनच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली होती. मात्र त्या वेळी पोलिसांनी कारवाई करूनही दोन दिवसांत त्याला सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी पैसे घेऊन संशयिताला सोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेमुळे जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


