भुसावळ नगरपरिषदेची उद्या होणारी सर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब, प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे

भुसावळ(प्रतिनिधी २२ मार्च ) – भुसावळ नगरपरिषदेची २३ मार्च रोजी होणारी सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी अधिकृत नोटीस काढून सभेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, तहकूब करण्यामागील ठोस कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही.

पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाढता संघर्ष हेच या निर्णयामागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. मागील काही सभांमध्ये जोरदार गदारोळ, शाब्दिक चकमकी आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले होते. ‘लाडका नगरसेवक’ योजनेसह विविध विकासकामांवरून वातावरण तापले होते. त्यामुळे अनेक सभा वादग्रस्त ठरत असून काही वेळा त्या तहकूब करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, सोमवारी होणारी सभा रद्द झाल्यामुळे शहरातील विकासकामे, बजेट मंजुरी आणि प्रभागनिहाय प्रस्ताव रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वीच्या सभेतही नगराध्यक्षा भंगाळे यांनी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद निर्माण झाला होता. आता तहकूबबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी याबाबत कोणतीही अधिकृत पत्रकार परिषद वा सूचना देण्यात आलेली नाही.

दरम्यान या पार्श्वभूमीवर वारंवार सभा तहकूब केल्या जात असल्याच्या तक्रारीवरून प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचले आहे. भाजपच्या २५ नगरसेवकांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ अंतर्गत अपील दाखल केले आहे. यावर २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित सर्व नगरसेवकांना नोटीस बजावून सुनावणीसाठी वैयक्तिक किंवा वकिलामार्फत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. गैरहजर राहिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नगरपालिकेतील सततच्या तहकूब बैठका, सत्तासंघर्ष आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा वाद आता जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पोहोचला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.