जागतिक चिमणी दिनानिमित्त जळगावात ४०० परळ वाटप : नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने शहरातील काव्यरत्नावली चौकात ४०० परळ (पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची भांडी) वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांना भासत असलेल्या पाण्याच्या टंचाईची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला असून नागरिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाद्वारे नागरिकांना आपल्या घराजवळ, गच्चीवर किंवा अंगणात परळ ठेवून चिमण्यांसह इतर पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतात चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, ग्रीन सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील, नगरसेवक नितिन बरडे, सदस्य डॉ. विनोद बाविस्कर तसेच वंदना मंडावरे, आशा मौर्य, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, हर्षा गुजराथी, नेहा जगताप, राधिका पाटील, स्मिता पाटील, पूजा हिंगु, पूर्वी शाह, जानवी जगताप, गौरव वनरा, किशोर पाटील यांसह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी “पाणी ठेवा, चिमण्या वाचवा” असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस व्यक्त करण्यात आला.