कलावंतांना सरकारचे पाठबळ आवश्यक – भावना गायकवाड :

जळगाव (प्रतिनिधी ) – गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने भुसावळ येथील सुप्रसिद्ध चित्रकार रमाकांत भालेराव यांच्या वारली पेंटिंगच्या चित्रप्रदर्शनाला अभिनेत्री भावना गायकवाड (नवी मुंबई) यांनी भेट देत दोन चित्रांची खरेदी केली. यामुळे स्थानिक कलेला प्रोत्साहन मिळाले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना भावना गायकवाड यांनी वारली पेंटिंगसारखी आदिवासी संस्कृती जपली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले. “लोकपरंपरेतून विकसित झालेली ही कला टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे यांनी कलावंत आणि साहित्यिकांना राजकारणी तसेच सरकारचे पाठबळ मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. “सरकार आणि समाजाच्या सहकार्यामुळेच कला जिवंत राहू शकते,” असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी लेखक-दिग्दर्शक चिंतामण पाटील, चित्रकार कुमावत सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.