एरंडोलमध्ये नात्याला काळीमा: मामाकडून ४ वर्षांच्या भाचीवर अत्याचार; आरोपी अटकेत, महामार्गावर संतापाचा उद्रेक

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याप्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील एका परिसरात चार वर्षांची चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. त्यांच्या घराशेजारीच तिचा मामा देखील राहतो. मंगळवारी दुपारच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून संशयिताने तिला आपल्या घरी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

काही वेळाने मुलीची आई घरी परतल्यानंतर तिला मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे तिने आजूबाजूला शोध घेतला असता चिमुकली मामाच्या घरात आढळून आली. यानंतर संतप्त आई-वडिलांनी तात्काळ एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित मामाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नातेवाईकांनी “आरोपीला आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

अखेर डीवायएसपी विनायक कोते यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.