सावदा – सावदा परिसरातील शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी छापा टाकून १३ गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन सुमारे २८ किलो ४५० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ लाख १४ हजार ३७ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा येथील पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १०) दुपारी सावदा–फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैरंम बुवा देवस्थान परिसरातील गट क्रमांक १६३ मधील शेतात पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी निलेश रमेश पाटील (वय ४०, रा. सावदा) यांनी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांना शेतात लावलेली १३ गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी ती झाडे जप्त करून पंचनामा केला. ही कारवाई मुक्ताईनगर येथील फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार राहुल सानप, तसेच तहसील प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय चौधरी, राजेंद्र बेदकर, निलेश वाघिसकर, सुनील झांबरे, मनोज तडवी, बबन तडवी आदींनी सहभाग घेतला.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


