भुसावळजवळ महाशिवपुराण कथा; शिवआराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतात – पंडित प्रदीप मिश्रा :

जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश; डॉक्टरांना शिवस्वरूप मानून उपचार घ्यावेत असाही दिला सल्ला

भुसावळ (प्रतिनिधी) :
भुसावळजवळील अकलूद शिवारात सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (१०) प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी भगवान भगवान शंकर यांच्या आराधनेचे महत्त्व भाविकांना पटवून दिले. शिवाची श्रद्धेने आराधना केल्यास जीवनातील कोणतीही कामना अपूर्ण राहत नाही, असे ते म्हणाले.

पंडित मिश्रा यांनी सांगितले की, शिवलिंगावर जल अर्पण करणे, बेलपत्र अर्पण करणे तसेच बेलपत्राच्या लाकडाचा त्रिपुंड टिळा पिंडीला लावणे ही भक्ती भाविकांनी करावी. या साध्या उपासनेमुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि भक्ताला आध्यात्मिक बळ प्राप्त होते.

जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश

कथेदरम्यान त्यांनी मदनासुराची कथा सांगत जिभेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मदनासुराला शिवभक्तीमुळे जिभेची सिद्धी मिळाली होती; मात्र त्याने त्या शक्तीचा दुरुपयोग केला. त्यामुळे देवांनी भगवान शिव यांची प्रार्थना केली. त्यानंतर शिवांनी आणि देवी पार्वती यांनी बगलामुखी अवतार धारण करून मदनासुराचा संहार केला, असे त्यांनी सांगितले.
“जिभ चालली नाही तर बंदूकही चालणार नाही. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

डॉक्टरांना शिवस्वरूप मानावे

आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना पंडित मिश्रा म्हणाले की, डॉक्टर हे साक्षात शिवाचे रूप आहेत. आजार झाल्यास डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत आणि त्यांनी दिलेली औषधे भगवान शंकराचा प्रसाद समजून स्वीकारावीत. शिवस्मरण आणि योग्य उपचार यामुळे गंभीर आजारांवरही मात करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अपशब्द न वापरणारेच खरे संत

भक्तिमार्गाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, भारतभूमीत अनेक संत असे आहेत ज्यांनी कधी कोणाची निंदा केली नाही. जे लोक इतरांची निंदा करतात किंवा अपशब्द वापरतात ते संतांच्या श्रेणीत येत नाहीत. “ज्यांच्या तोंडातून कधी अपशब्द निघत नाहीत, तेच खरे संत,” असे ते म्हणाले.

महाशिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भगवान शंकराच्या महिमेचे श्रवण केले.