भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ७ मार्च रोजी भुसावळ पोलीस उपविभागीय कार्यालयात महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम भुसावळ पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

भुसावळ पोलीस विभागातील भुसावळ शहर, बाजार पेठ, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, भुसावळ तालुका व नशिराबाद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र, रोपटे व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी राबविलेल्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे उपस्थित महिला पोलीस व महिला पोलीस पाटील यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विशेष म्हणजे भुसावळ उपविभागीय कार्यालय व तालुका पोलीस स्टेशनमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ शहर वाहतूक विभागाचे उमेश महाले तसेच नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे उपस्थित होते.



