जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपरिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार

भुसावळ (प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच भुसावळ नगर परिषदेच्या इतिहासात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी, रोहिणीताई खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, राज्य पुरस्कारप्राप्त मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे, उपनगराध्यक्ष शैलाजाताई नारखेडे, माजी नगराध्यक्ष रेखाताई चौधरी, समाजसेविका ललिताताई चौधरी, नाट्य अभिनेत्री व आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल रेफरी मंजुषा भिडे, डॉक्टर श्रद्धा चांडक तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक-चित्रकार बी. एन. चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन प्रकल्प प्रमुख जिल्हा समन्वयक उत्तम सुरवाडे यांनी केले आहे.

विविध स्तरातील महिलांचा सन्मान

कार्यक्रमात नगरपालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, साफसफाई कर्मचारी, दक्षता समिती सदस्य अशा विविध स्तरांतील कष्टकरी व उपेक्षित महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच संगीत, साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक महिलांनाही गौरविण्यात येणार आहे.

लकी ड्रॉद्वारे पैठणी जिंकण्याची संधी

कार्यक्रमास उपस्थित महिलांना कूपन देण्यात येणार असून सक्रिय सहभाग घेणाऱ्या महिलांना विविध निकषांनुसार लकी ड्रॉद्वारे पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

आरोग्यविषयक मार्गदर्शन

महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर श्रद्धा चांडक या महिलांचे आरोग्य, आजारांपासून बचाव आणि आवश्यक काळजी याबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

‘सांस्कृतिक वारसा’ बोधचिन्हाचे अनावरण

भुसावळची नवी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सांस्कृतिक वारसा’ या बोधचिन्हाचे अनावरण माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठी भाषा सप्ताह व महिला दिनानिमित्त हा उपक्रम मराठमोळ्या पद्धतीने सुरू करण्यात येणार असून साहित्यिका सीमा भारंबे यांच्या निवासस्थानी त्यांच्या नावाची मराठी पाटी लावून या प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार आहे. पुढील टप्प्यांत हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

विशेष आकर्षण नाट्यकर्मी मंजुषा भिडे

नाट्यकर्मी मंजुषा हेमंत भिडे या गेल्या ३२ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून सध्या विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असून आंतरराष्ट्रीय रेफरी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रंगभूमीशी त्यांचे घट्ट नाते असून अनेक नाटके व अभिवाचन कार्यक्रमांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘अपूर्णांक’ या नाटकाचे महाराष्ट्रभर सुमारे ५० प्रयोग झाले असून सध्या ‘पालखी’ या नाटकाचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही प्रयोग सुरू आहेत. अभिनय, नृत्य, गायन आणि नाट्य हे त्यांचे आवडीचे छंद असून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक नाटके दिग्दर्शित करून बालराज्य नाट्य स्पर्धा व अभिवाचन महोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण घडवून आणले आहे.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे कष्टकरी व उपेक्षित महिलांच्या कार्याला योग्य सन्मान मिळणार असून महिला दिनानिमित्त भुसावळमध्ये सामाजिक व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.