अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “हितगुज ” कार्यक्रम उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी ) : अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने “हितगुज – 3 मिनिट… एक प्रेरणा” हा आगळावेगळा व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांना त्यांच्या आयुष्यातील अनुभव, प्रेरणा आणि सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात सहभागी महिलांनी “माझा टर्निंग पॉइंट”, “मी आणि माझी सुपरपॉवर” तसेच “माझ्या आयुष्यातील आयडॉल” या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर तीन मिनिटांत आपले अनुभव मांडले. हा कार्यक्रम स्पर्धात्मक नसून मैत्रीपूर्ण हितगुजाचा मंच असल्याने सर्व महिलांनी मनमोकळेपणाने आपले विचार मांडले. सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अलका ढाके, जागृती चौधरी व डॉ. चारुलता पाटील यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच किर्ती मोताळकर व वंदना ढाके यांना “खानदेशी रंगत पंगत” हे पुस्तक, प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. जयश्री ढाके, सुनंदा औंधकर, विद्या रामवंशी, प्रतिभा गायकवाड, जयश्री इंगळे व स्मिता पाटील यांनाही प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे परीक्षण नीलिमा नेहेते व मदर केअरच्या संचालिका जयश्री चौधरी यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. मनोगतात त्यांनी महिला दिन व शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगला पाटील होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मंडळामार्फत दरवर्षी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगत भविष्यात निराधार महिलांसाठी महिलाश्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

उपाध्यक्ष प्रभावती पाटील व सचिव राजश्री कोलते यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. सल्लागार सदस्य आरती चौधरी यांनी महिलांच्या मानसिक आरोग्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कुरकुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खजिनदार स्वाती भोळे, सहसचिव कावेरी चौधरी तसेच सदस्या कल्पना शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्व महिलांनी सकल लेवा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.