शिर्डी (प्रतिनिधी) : नगर-मनमाड महामार्गावर अवैधरीत्या वाहतूक होत असलेले प्रतिबंधित मांगुर मासे जप्त करत स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पथक शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत ट्रक क्रमांक WB25M5023 मध्ये केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले मांगुर मासे भरून तो नगर-मनमाड महामार्ग मार्गे निमगाव बायपास चौकातून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निमगाव बायपास येथे सापळा रचून ट्रक ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
ट्रकची तपासणी केली असता केबिनमध्ये प्रतिबंधित मांगुर मासे आढळून आले. ट्रकमधील इसमांची नावे स्वपन नियम डे (रा. पश्चिम बंगाल), मकबुल रौफ सरदार, कुतुब आयुब मंडल व मृत्युंजय मुकुल विश्वास अशी असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत सदर मासे पश्चिम बंगाल येथून भरून खोपोली मार्गे मुंबई येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर ट्रक शिर्डी पोलीस ठाण्यात आणून मत्स व्यवसाय विकास अधिकारी प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांना बोलावण्यात आले. त्यांनी ट्रकमधील मासे प्रतिबंधित मांगुर असल्याचा अभिप्राय दिला.
या कारवाईत ४ लाख रुपये किमतीचे सुमारे ४०० किलो प्रतिबंधित मांगुर मासे तसेच २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


