जळगाव (प्रतिनिधी ) : भाचीच्या लग्नासाठी घरात ठेवलेले तब्बल २ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भाच्यानेच लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी राजीव गांधी नगर येथे घडली. या प्रकरणी १ मार्च रोजी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

राजीव गांधी नगरमधील सुनीता वामन लोंढे (वय ३४) यांनी आपल्या भाचीच्या लग्नासाठी २ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने पेटीत सुरक्षित ठेवले होते. मात्र २६ फेब्रुवारी रोजी दागिने ठेवलेली पेटी घरातून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी भाचीला विचारणा केली असता मध्यरात्री समाधान लोंढे हा घराबाहेर जाताना दिसल्याचे सांगण्यात आले.
समाधान लोंढे याच्याकडे चौकशी केली असता त्याने मित्रांच्या मदतीने पेटी व त्यातील दागिने नेल्याची कबुली दिली. दागिने परत देण्याची मागणी करूनही त्याने ते न दिल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानुसार पोलिसांनी समाधान लोंढे, प्रेम सकट आणि निखिल हातग या तिघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत व नीलेश पाटील यांनी केली. दरम्यान, या प्रकरणातील साहील अवचारे हा संशयित अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सुरू आहे.


