जळगाव, (प्रतिनिधी)– सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मुक्ताईनगर तालुक्यातील एका ७१ वर्षीय निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याची तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार मनोहर वसंत चौधरी (रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांना १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून कॉल आले. फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख ‘राज मल्होत्रा’ अशी करून तो ‘डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चा प्रतिनिधी असल्याचे सांगितले, तर ‘संदीप रॉय/राव’ नावाच्या व्यक्तीने वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवले.
भामट्यांनी चौधरी यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाल्याची खोटी माहिती दिली. भीती निर्माण करण्यासाठी संशयितांनी व्हॉट्सअॅपवर न्यायालयाचे बनावट आदेश तसेच खोटे पोलीस कागदपत्रे पाठवली. अटक टाळण्यासाठी मोठी रक्कम तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली.
घाबरलेल्या चौधरी यांनी १७ ते २७ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी RTGS व NEFT द्वारे आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये जमा केले. मात्र सतत वाढत्या पैशांच्या मागणीमुळे आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
नागरिकांना आवाहन
पोलीस अधिकारी, न्यायालय किंवा सरकारी संस्थेचे नाव सांगून कोणीही फोनवरून पैसे मागितल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


