भुसावळ तालुक्यात तीन शहीद स्मारकांची लवकरच निर्मिती; ४५ लाखांचा निधी

भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि नव्या पिढीला त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा मिळावी, यासाठी तालुक्यात तीन ठिकाणी शहीद स्मारकांची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) डॉ. निलेश प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५ लाख रुपये खर्चून ही स्मारके उभारली जाणार असल्याची माहिती सुभेदार मेजर (नि.) संजय गायकवाड तथा सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी आणि नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे यांनी दिली. या उपक्रमासाठी प्रा. उत्तम सुरवाडे पाठपुरावा करीत आहेत.

शहीद राकेश शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ येथील नाहाटा कॉलेज चौफुली येथे आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ. गायत्रीताई भंगाळे, तहसीलदार नीता लबडे यांचे प्रतिनिधी म्हणून पुरवठा विभागाचे श्री. गुरव, जिल्हा समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे, नगरसेवक अकिल पिंजारी, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, मेजर नरवाडे, शहीद राकेश शिंदे यांचे बंधू सुरेश शिंदे, वीर माता अनुसयाबाई शिंदे, माजी जि.प. सदस्य समाधान पवार, उमाकांत शर्मा, अॅड. गोलू कापडे, श्री. मराठे, शिवसेना शहर प्रमुख गणेश चौधरी, शिक्षक संघटनेचे रवींद्र पालवे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शिंदे परिवारातील दुर्गाबाई शिंदे, ज्योती शिंदे, विनोद शिंदे, किरण शिंदे, अविनाश शिंदे, भूषण शिंदे, दर्शन शिंदे, पद्मश्री शिंदे आदी उपस्थित होते.

वीरमातेला सन्मान

कार्यक्रमात वीर माता अनुसयाबाई शिंदे यांचा साडी-चोळी देऊन नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्या भावुक झाल्या आणि उपस्थितांनाही क्षणभर स्तब्धता लाभली.

कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा

मेजर (नि.) संजय गायकवाड यांनी शहीद राकेश शिंदे यांच्यासोबत Kargil War दरम्यान प्रत्यक्ष रणांगणावर लढताना अनुभवलेल्या प्रसंगांची आठवण सांगितली. नवथेरा सेक्टरमधील जंगल परिसरात शिंदे यांनी दाखविलेल्या शौर्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले. तालुक्यात उभारण्यात येणारी ही तीन शहीद स्मारके आगामी काळात देशभक्तीची प्रेरणास्थाने ठरतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.