मुस्लिम नुमाइंदा फाउंडेशन भुसावळ यांच्या वतीने रमजान निमित्त रेशन किट वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम नुमाइंदा फाउंडेशन (एम एन एफ) यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त गरीब, गरजू व असहाय कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. समाजातील सर्व घटकांसाठी सेवा कार्य करणाऱ्या.( एम एन एफ) संस्थेने मागील चार-पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले आहेत.

गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असक्षम कुटुंबांना मासिक मानधन (पेन्शन) देणे असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जात आहेत. हे सर्व उपक्रम मुस्लिम समाजाकडून जमा होणाऱ्या जकात निधीतून राबविले जातात.

संस्थेचे कार्य पाहून समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक रमजान महिन्यात आपली जकात (एम एन एफ) कडे सुपूर्द करतात, ज्यामुळे वर्षभर गरजू आणि वंचित घटकांना मदत करता येते. या माध्यमातून संस्था सातत्याने समाजोपयोगी काम करत आहे.

यापुढेही हे सेवा कार्य अखंडित सुरू राहावे यासाठी मुस्लिम नुमाइंदा फाउंडेशनने मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की, त्यांनी आपली जकात ( एम एन एफ) कडे जमा करून समाजातील गरजू बांधवांना मदतीचा हात द्यावा.