वरणगावमध्ये ५८ भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


भुसावळ(प्रतिनिधी ) – तालुक्यातील वरणगाव येथे भारत गॅस कंपनीअंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ५८ भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीस गेलेल्या सिलेंडरची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
लाल माती शिवारातील गोडाऊन लक्ष्य
वरणगाव–मुक्ताईनगर महामार्गावरील लाल माती शिवारात रोहन गॅस एजन्सीचे गोडाऊन असून, ते एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (रा. भुसावळ) यांच्या मालकीच्या जागेवर आहे. दुकानासाठी अतिरिक्त सिलेंडरचा साठा येथे ठेवण्यात येतो.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप व कडी-कोंड्या तोडून आत प्रवेश केला. उपलब्ध असलेले ५८ भरलेले सिलेंडर (प्रति सिलेंडर सुमारे १,२७८ रुपये दराने) चोरून नेण्यात आले.
सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गोडाऊनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोणताही चौकीदार किंवा सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद अवस्थेत होते. या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी चोरीचा उलगडा
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गोडाऊन किपर शंकर किसन सुरवाडे (रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव) आणि कर्मचारी अभिलाष बावस्कर हे सिलेंडर घेण्यासाठी गोडाऊनवर गेले असता कुलूप तोडलेले व सिलेंडर गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ संचालक नरेंद्र अहिरे यांना माहिती दिली.
यानंतर अहिरे यांनी वरणगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
परिसरात खळबळ
या घटनेमुळे वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षा व्यवस्थेच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली असून, लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.