शहरात दहशत पसरवणारा तलवारधारी युवक जेरबंद; पोलिसांची सलग दुसरी धडक कारवाई

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जेरबंद केले आहे. पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने आठवड्यातील सलग दुसरी धडक कारवाई करत शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली आहे.

जळगाव जिल्हा येथे शस्त्र अधिनियमाखालील गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शाखेला विशेष पथक तयार करून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.

दरम्यान, पाचोरा येथील जारगाव चौफुली परिसरात एक तरुण धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित सोमनाथ वना पाटील (वय 19, रा. हनुमान नगर, पाचोरा) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. 84/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत शस्त्र अधिनियमाखाली आठवड्यातील सलग दुसरी कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील आणि हरीश परदेशी यांचा समावेश होता.

पाचोरा पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठोस संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.