भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ वामन सानप यांनी दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची समक्ष भेट घेऊन भुसावळ तहसील कार्यालयात अॅफिडेव्हिड करून देण्याची सेवा बंद असल्याबाबत तक्रार केली.

मागील पाच ते सहा महिन्यांपासून अॅफिडेव्हिडचा प्रकार बंद असल्याची माहिती श्री. सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. साक्षीदाराचे अॅफिडेव्हिड करण्यासाठी ते भुसावळ तहसील कार्यालय येथे गेले असता निवासी नायब तहसीलदार यांनी शासन परिपत्रकाचा दाखला देत अॅफिडेव्हिड करून देता येणार नसल्याचे तोंडी सांगितले, अशी तक्रार करण्यात आली. संबंधित परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून नागरिकांची दिशाभूल व गैरसोय केली जात असल्याचेही श्री. सानप यांनी निदर्शनास आणून दिले.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तत्काळ आपल्या स्वीय सहाय्यक स्वप्नील येवले यांना तोंडी आदेश देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार अॅफिडेव्हिड संदर्भात योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर तहसील कार्यालयामार्फत श्री. सानप यांचे अॅफिडेव्हिड करून देण्यात आले असून ही सेवा सर्व नागरिकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे. या कार्यवाहीबद्दल केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आभार मानले आहेत.


