मध्य रेल्वे भुसावळ विभागात आपत्कालीन वैद्यकीय कक्षांची सुविधा; प्रवाशांना तात्काळ उपचार उपलब्ध

भुसावळ, दि.२३(प्रतिनिधी ) — प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागातील प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (EMR) स्थापन करण्यात आले असून, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना त्वरित मदत उपलब्ध होत आहे.

भुसावळ विभागांतर्गत नाशिक रोड रेल्वे स्थानक, मनमाड रेल्वे स्थानक, जळगांव रेल्वे स्थानक, भुसावळ रेल्वे स्थानक, शेगांव रेल्वे स्थानक आणि अकोला रेल्वे स्थानक येथे हे कक्ष कार्यरत आहेत. अपघात, अचानक आजारपण किंवा इतर आपत्कालीन घटनांमध्ये बोनाफाइड प्रवासी तसेच रेल्वे कर्मचारी यांना प्रथमोपचार आणि तातडीची वैद्यकीय सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सदर EMR कक्षांमध्ये मूलभूत जीवनरक्षक उपकरणे, ऑक्सिजन पुरवठा, स्ट्रेचर तसेच आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. याठिकाणी उच्च शिक्षित डॉक्टर आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी २४ तास सेवेत असतात. याशिवाय पोर्टेबल लॅब, मेडिकल स्टोअर आणि रुग्णवाहिका सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद वेळ कमी होऊन ‘सुवर्णकाळात’ रुग्णांना अत्यावश्यक मदत मिळणे शक्य होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी भुसावळ विभागाने घेतलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरत असून, प्रवाशांच्या आरोग्य व कल्याणासाठीची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे.