भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील त्रिरत्न बुद्ध विहारात परिसर स्वच्छता अभियान राबवून तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या राज्य संघटक लताताई तायडे, मिरा नरवाडे, नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचे जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, लॉर्ड बुद्ध टी.व्ही.चे जिल्हा प्रतिनिधी रमेश खंडारे तसेच संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश सरदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी लताताई तायडे यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. “संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर समाजातील घातक परंपरा, रूढी आणि अंधश्रद्धांवर भजनाच्या माध्यमातून प्रहार केला. त्यांचे कार्य आजच्या पिढीने लक्षात घेऊन आचरणात आणले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सुमेध कांबळे, अजय वाघ, प्रणव मेश्राम, शुभम खंडारे, विशाल मेश्राम, तरुण गवई, निखिल मेश्राम आदी उपस्थित होते. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने त्रिरत्न बुद्ध विहारास संत गाडगे महाराज यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सरदार यांनी केले.


