जामनेर .— तालुक्यातील पहूर येथे एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास हिवरी–हिवरखेडा फाटा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली असून त्यास जळगाव जिल्हा न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेचा तपशील
पीडित तरुणी ही नेरी येथील रहिवासी असून फर्दापूर येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपीने तिच्यावर एकतर्फी प्रेम असल्याचे सांगत वारंवार लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला.
शनिवारी सकाळी आरोपीने तरुणीचे अपहरण करून तिला पहूरजवळील हिवरखेडा फाट्याजवळील एका शेतात नेले. तेथे तिच्या डोक्यावर दगडाने वारंवार प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचाही आरोप आहे.
उपचार व प्रकृती
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणीला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करून सुमारे २७ टाके घालत रक्तस्राव थांबवला. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी आरोपी श्रीकृष्ण देवचंद जाधव (रा. चारू तांडा, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध अपहरण, खुनाचा प्रयत्न, जातीवाचक शिवीगाळ व धमकी यांसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने जप्त करून तपासासाठी पाठविले आहेत.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकतर्फी प्रेमातून वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबाबत पालक व सामाजिक संस्थांनी चिंता व्यक्त केली असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी व तरुणांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.


