भुसावळ रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अन्नातून विषबाधा; ६० ते ८० प्रशिक्षणार्थी बाधित

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ येथील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या सुमारे ६० ते ८० प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून सर्व बाधितांना तातडीने रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भुसावळ शहरातील आर.पी.डी. परिसरात असलेल्या रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास अचानक अनेक प्रशिक्षणार्थींना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही वेळातच बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशिक्षण केंद्रात एकच गोंधळ उडाला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका पाचारण केल्या. सर्व बाधित प्रशिक्षणार्थींना उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात हलवण्यात आले.

या संदर्भात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालय उपाध्यक्ष व्ही. के. समाधीया यांनी सांगितले की, “घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या आहेत. सध्या सर्व बाधितांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.”

दरम्यान, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मेसमध्ये देण्यात आलेल्या अन्नामुळेच विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे अन्नाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.