भुसावळ (प्रतिनिधी):
येथील ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एम. ललवाणी यांनी आपले पुत्र स्व. स्वप्निल यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. त्यांनी बेघर, बेसहारा, अनाथ तसेच उन्हा–पावसात व थंडीत अस्ताव्यस्त अवस्थेत भटकणाऱ्या मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या प्रमिलाई व मोहनलाल परिवार मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र, बोदवड येथे अन्नदान करून हा दिवस अर्थपूर्ण केला.

सर्वदानांत अन्नदानाला श्रेष्ठ मानले गेले असून, आत्मसन्मान फाउंडेशनला कोणतेही शासकीय अनुदान प्राप्त नसताना समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे सेवाकार्य सातत्याने सुरू आहे. आत्मसन्मान फाउंडेशन हे खऱ्या अर्थाने मनोरुग्णांचे हक्काचे माहेरघर असून येथे निस्वार्थ भावनेने ‘सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार कार्य केले जाते.
या प्रसंगी जेष्ठ श्रावक मदनलालजी ललवाणी, नवीन ललवाणी, हेमंत मंडलेचा, अजय गादिया, सौ. शोभा ललवाणी, सौ. ज्योती ललवाणी यांनी सेवा कार्यात सहभाग घेतला. अशा पवित्र कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी आत्मसन्मान फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मसन्मान फाउंडेशनचे सेवार्थी रवी माळी, आकाश बावस्कर व मनिषा तेली यांनी सहकार्य केले. समाजात माणुसकीची जपणूक करणारे हे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.



