भुसावळ ( प्रतिनिधी ) –

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील पुष्पलता नगर परिसरात पिंपळाच्या झाडाखाली अघोरी स्वरूपाचे कृत्य आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना पिंपळाच्या झाडाखाली काळ्या रंगाची बाहुली, त्यावर पती-पत्नीची नावे लिहिलेली, तसेच नारळ, लिंबू, फुले व इतर पूजेचे साहित्य ठेवलेले आढळून आले. या बाहुलीवर अनिल जोहरे व त्यांची पत्नी सुनीता जोहरे यांची नावे लिहिलेली असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित पती-पत्नीने तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि समाजात भीती निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या प्रकारामागे असलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनिल व सुनीता जोहरे यांनी केली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


