रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडे महत्त्वपूर्ण मागणी :केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रतापराव जाधव यांच्याशी नवी दिल्लीत भेट :

नवी दिल्ली : रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री मा. ना. श्री. प्रतापराव जाधव यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आर्थिक वर्ष २०२६–२७ मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत सविस्तर मागणीपत्र सादर केले.

रावेर मतदारसंघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जुन्या इमारती पाडून आधुनिक व सुसज्ज इमारतींचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागणीपत्रात मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, यावल, चोपडा व बोदवड तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व कर्मचारी निवासस्थानांचे नव्याने बांधकाम, काही ठिकाणी केवळ कर्मचारी निवासस्थाने उभारणे, पाल, रावेर व बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयांचे पुनर्बांधकाम तसेच सावदा येथे शवविच्छेदन कक्ष उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे उभारण्याचीही मागणी करण्यात आली.

या मागण्यांची गंभीर दखल घेत मा. ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. रावेर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी सांगितले.