चाळीसगावमध्ये मध्यरात्री गोळीबार; जुन्या वादातून तरुण जखमी : रेल्वे स्थानकाजवळील घटना, संशयित पसार; पोलिस व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

चाळीसगाव (प्रतिनिधी ) –
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ३० वर्षीय तरुणावर गोळी झाडण्यात आल्याची घटना समोर आली असून या गोळीबारात रोहिदास रामू कोळी (वय ३०, रा. चाळीसगाव) हा तरुण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री संशयित आरोपीने रोहिदास कोळी याच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी रोहिदासच्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जून महिन्यात रोहिदास कोळी याने संशयिताविरोधात भादंवि कलम ३२४ अंतर्गत मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या जुन्या वादाचा राग मनात धरून संशयिताने रोहिदास समोर दिसताच वाद उकरून काढत गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबारानंतर संशयित आपल्या एका साथीदारासह घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमित मनेल यांच्यासह पोलिस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून जखमी तरुणाकडूनही अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पसार झालेल्या संशयिताचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.