भुसावळ पालिका निवडणूक : 1400 कर्मचार्‍यांना 17 लाखांचे मानधन; होमगार्ड बांधवांची नाराजी व्यक्त

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत काम पाहणाऱ्या 191 मतदान केंद्रांवरील सुमारे 1400 कर्मचार्‍यांना एकूण 17 लाख रुपयांचे मानधन वाटप करण्यात आले. मतदान केंद्र व्यवस्था, तांत्रिक कामकाज, सुरक्षा, साहित्य वितरण आणि परतावा यांसारख्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडल्याबद्दल या कर्मचार्‍यांना मानधन देण्यात आले.

मतदान प्रक्रिया सुरळीत

निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचार्‍यांनी पूर्ण प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम पार पाडले. अनेक मतदान केंद्रांवर कामकाज वेळेत सुरू राहावे यासाठी कर्मचार्‍यांनी अतिरिक्त तासही काम करून मतदान प्रक्रियेची शिस्त राखली.
मंगळवारी संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत मतदान केंद्रांवरच मानधन वितरणाची प्रक्रिया पार पडली. नावे पडताळून रक्कम कर्मचार्‍यांना देण्यात आल्याने बहुतांश कर्मचारी समाधानी दिसून आले.

होमगार्ड जवानांची नाराजी

तथापि, या मानधन वितरणात होमगार्ड बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कर्मचार्‍यांच्या कार्याचे कौतुक केले असले तरी होमगार्डना अपेक्षित मानधन न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भोळे महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश सावळे यांनी सांगितले की,
“यावल, रावेर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना जास्त रक्कम देण्यात आली, मात्र भुसावळ येथे फक्त 350 रुपये देण्यात आले. निवडणूक नियम सर्वत्र सारखे असताना हा दुभाजाव कशासाठी?”

कर्मचार्‍यांच्या मते, भुसावळ शहरातील काही कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना आहे आणि मानधन वितरणात समानता राखण्याची मागणी ते करत आहेत.

निवडणूक विभागाकडून मात्र या तक्रारींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.