पत्र्याच्या शेडमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे चिमुकल्याचा मृत्यू : जळगावातील घटना ;

जळगाव तालुक्यातील सुजदे गावात मंगळवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत सहा वर्षीय मुलाचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला. प्रेम नरेंद्र सोनवणे (वय ६) हा घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत असताना ही दुर्घटना घडली.

घराच्या शेडवरून जाणारी मुख्य विद्युत वाहिनी अचानक तुटून शेडमध्ये प्रवाह उतरला होता. त्याचवेळी प्रेम खेळत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन विद्युत प्रवाह खंडित केला आणि प्रेमला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले.

या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. सुजदे येथील नरेंद्र सोनवणे हे शेती व्यवसाय करतात, तर त्यांच्याकडे दोन मुले असून त्यातील प्रेम हा मोठा मुलगा होता.

या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.