शिंदी परिसरात विद्युत तार चोरीच्या घटनांना ऊत : पोलीस प्रशासनाकडून तत्काळ दखल :

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शिंदी परिसरात मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत तार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पीक सिंचनासाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी मौजे विचवे गावातील शेतकरी भरत पंढरी भोळे यांच्या शेतातूनही महावितरणची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या संदर्भात शिंदी वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता श्री. आखरे यांनी बोदवड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिस प्रशासनाने तत्परतेने दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

या भागात वारंवार होणाऱ्या चोरींचा माग काढण्यासाठी दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी बोदवड पोलिस स्टेशनचे निरीक्षक . अरविंद भोळे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी महावितरणचे कर्मचारी तसेच संबंधित पोलीस पाटील उपस्थित होते. पोलीस निरीक्षक भोळे यांनी परिसरातील कर्मचाऱ्यांना व पोलीस पाटलांना आवश्यक त्या सुचना देत चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी काटेकोर तपास करण्याचे आश्वासन दिले. महावितरणचे कर्मचारी पोलिसांच्या सहकार्याने सदर घटनांचा तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.