धरणगाव – येथील शासकीय आयटीआय परिसरात पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईत तब्बल साडेसात किलो गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास धरणगाव–चोपडा रोडवरील आयटीआयजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर पोलिसांनी परिसरात दबा धरत तपास केला असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात धरणगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, तसेच कॉन्स्टेबल दीपक माळी, रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील आणि किशोर भोई यांचा समावेश होता.
कारवाई दरम्यान एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


