फैजपूर (प्रतिनिधी) – नुकत्याच 2 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी तफावत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. एनमुक्टो प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय सहसचिव डॉ. विजय सोनजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावे फैजपूरचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यावल नगरपालिका सहित राज्यातील इतर ठिकाणी केंद्राध्यक्षांना 3000, मतदान अधिकाऱ्यांना 2600 तर शिपायांना 1700 रुपये मानधन देण्यात आले. मात्र फैजपूर येथे प्रत्येकी तब्बल 1000 रुपये कमी मानधन देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. एकाच जिल्ह्यात, एकाच तालुक्यात आणि समान जबाबदारीच्या कामासाठी इतकी तफावत का असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर डॉ. विजय सोनजे, डॉ. ताराचंद सावसाकडे, डॉ. रवी केसूर, डॉ. मच्छिंद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, डॉ. जगदीश खरात, डॉ. योगेश तायडे, डॉ. अचल भोगे यांसह अनेक सदस्यांच्या सह्या आहेत.
निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी संबंधित विषयावर निवडणूक अधिकारी व कार्यालयीन पातळीवर तातडीने चर्चा करून आठ दिवसांत सकारात्मक व योग्य निर्णय घेतला जाईल, तसेच कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.


