भुसावळात ५४.९१ टक्के मतदान, गेल्या निवडणुकीपेक्षा साडेतीन टक्का मतदान कमी, सत्ताधाऱ्यांचीही धाकधूक!

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी‎ शहरातील १९१ केंद्रांवर ५४.९१ टक्के मतदान‎ झाले. नऊ वर्षांपूर्वी सन २०१६ मध्ये झालेल्या‎ निवडणुकीत ५८.३३ टक्के मतदान झाले होते. त्या‎ तुलनेत यंदा ३.४२ टक्के मतदान कमी झाले. गेल्या‎ निवडणुकीत १ लाख ५८ हजार ६२७ पैकी ९२ हजार‎ ५२७ मतदारांनी मतदान केले होते. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का चांगला हाेता. त्यानंतर मात्र वेग मंदावला. मात्र, सायंकाळी चार वाजेनंतर मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. मात्र, असे असले तरी मतदानाचा टक्का घसरल्याने सत्ताधारी उमेदवारांची धाकधूम वाढली आहे. मतदानानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. यंदाच्या‎ निवडणुकीत १ लाख ७८ हजार ७८० पैकी ९८ हजार‎ १७७ मतदारांनी हक्क बजावला.‎ पालिका निवडणुकीत तीन जागा बिनविरोध‎ झाल्या. तर तीन जागांचे मतदान २० डिसेंबरला होणार‎ आहे. यामुळे मंगळवारी ४४ जागांसाठी २३२‎ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले.

रेल्वे उत्तर भागात दिसला निरुत्साह

भुसावळ पालिकेच्या नगराध्य पदाच्या लढतीतील राष्ट्रवादी शरद पवार गट व भाजप अशा प्रमुख दाेन्ही पक्षाचे उमेदवार हे रेल्वेच्या दक्षिण भागातील हाेते. त्यामुळे या भागात मतदारांत प्रचंड उत्साह हाेता. मुस्लीम बहूल भागात तर रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या हाेत्या. मात्र, रेल्वे उत्तर भागात मात्र नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणारे उमेदवार हे फारसे प्रभावी नव्हते. त्यामुळे या भागात अपेक्षित उत्साह दिसला नाही. मागच्या निवडणुकीत शहराच्या रेल्वे उत्तर भागातील भाजपचे रमण भाेळे हे उमेदवार हाेते. त्यामुळे या भागात मतदारांत प्रचंड उत्साह हाेता. पण ताे या वेळी दिसला नाही. त्यामुळे हे चित्र भाजपची धाकधूक वाढवणारे असल्याचे द्याेतक मानले जाते आहे.

चाैधरी बंधू, मंत्री सावकारे तळ ठाेकून

सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी मतदा संपेपर्यंत माजी आमदार संताेष चाैधरी व त्यांचे बंधू अनिल चाैधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी शहरात ठाण मांडून हाेते. शहराच्या उत्तर वाॅर्डाची धुरा अनिल चाैधरी आणि त्यांच्या दहा जणांच्या टिमने सांभाळली. तर दक्षिण भागाची जबाबदारी स्वत: माजी आमदार संताेष चाैधरी यांनी सांभाळली. त्यांच्या साेबत त्यांचा मुलगा सचिन व जयेश आणि पुतण्या धीरज असे तिन्ही जण पायाला भिंगरी लावून मतदारांना बाहेर काढत हाेते. दुसरीकडे मंत्री संजय सावकारे, त्यांच्या पक्षाचे नगरसेवकही लक्ष ठेऊन हाेते. भाजपने या वेळी ज्या उमेदवारांचे तिकिट कापले त्या भागात मतदारांचा प्रतिसाद कसा राहिला? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.