भुसावळ प्रतिनिधी
आज २ डिसेंबर रोजी होणाऱ्या भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान यंत्रणा व साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक असलेली कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट तसेच इतर साहित्याची वाटप व्यवस्था करण्यात आली.

साहित्य वाटपासाठी १ ते २४ असे हजेरी टेबल तर प्रत्यक्ष साहित्य वितरणासाठी १ ते १९ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण २४ सेक्टर ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यासाठी २४ एर्टिगा वाहनांची सोय केली आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणाऱ्या टीमसाठी ४५ टेम्पो ट्रॅव्हलर, २४ क्रूझर गाड्या, तसेच पोलीस विभागासाठी ४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील १९१ मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले सुमारे १२०० कर्मचारी आवश्यक साहित्यांसह आपल्या-आपल्या केंद्रांकडे रवाना झाले आहेत. शहरातील ४० संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

या संपूर्ण प्रक्रियेबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील व संतोष विनंते यांनी दिली. निवडणुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने डीवायएसपी संदीप गावीत, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल वाघ, तालुका पोलीस स्टेशनचे उध्दव डमाळे, तसेच जळगाव येथून आलेले अन्य अधिकारी व कर्मचारी यांचीही तैनाती करण्यात आली आहे.
नगरपरिषद निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.



