चोपडा (प्रतिनिधी) पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात शनिवारी राबवलेल्या धडक मोहीमेत तब्बल ५० अवैध शस्त्र निर्मिती कारखाने उद्ध्वस्त करत ३६ संशयितांना ताब्यात घेतले. गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारांकडून सापडलेल्या पिस्तूल व गावठी कट्ट्यांवर ‘यूएसए’ असा शिक्का असल्याने पोलिसांनी त्याचा तपास केला असता ही शस्त्रे प्रत्यक्षात ‘उमर्टी शिकलगार आर्म्स’ येथे तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पुणे पोलिसांनी तीन आठवड्यांची गुप्त तयारी करून ‘ऑपरेशन उमर्टी’ राबवले.

उमर्टी गावातून महाराष्ट्रासह इतर राज्यांत मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. गावातील शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी शीघ्र कृती दल, अश्रुधुर पथक आणि मध्य प्रदेश एटीएसची मदत घेण्यात आली. छापेमारीदरम्यान मोठ्या संख्येने गावकरी एकत्र येत पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र अत्यंत काटेकोर नियोजनामुळे कारवाई यशस्वी ठरली. मोहिमेत २१ रेडीमेड पिस्तुले तसेच मोठ्या प्रमाणात बॅरल, पाईप, मॅगझीन स्प्रिंग आणि लेथ मशीनवर वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
गेल्या दोन-तीन दशकांपासून उमर्टी गाव हे अवैध शस्त्रनिर्मितीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध आहे. येथे मागण्यांनुसार विशिष्ट प्रकारची शस्त्रे पारंपरिक पद्धतीने तयार केली जातात. अनेक ठिकाणांहून साहित्य आणून पाच ते सहा तासांत पूर्ण शस्त्र तयार केले जाते आणि ओळखीच्या दलालांच्या माध्यमातून ते १५ ते २० हजार रुपयांत विकले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तयार झालेली ही शस्त्रे जळगाव, धुळे मार्गे दुचाकी आणि चारचाकी वाहनांतून महाराष्ट्रात आणली जात होती.
पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराज्यीय अवैध शस्त्र व्यवहाराला मोठा धक्का बसला असून या रॅकेटमागील इतर सूत्रांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे


