रेल्वेच्या सतर्क महिला तिकीट परीक्षकाने ओळखले बनावट तिकीट ;

मध्य रेल्वेच्या महिला तिकीट परीक्षक सुजाता काळगांवकर यांनी १५.११.२०२५ रोजी एका प्रवाशाला बनावट सीजन तिकिटासह प्रवास करताना पकडले.

तिकीट परीक्षक सुजाता काळगांवकर या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कल्याण विशेष पथक (स्पेशल स्क्वॉड) मध्ये कार्यरत असून, १५.११.२०२५ रोजी मस्जिद स्थानकावर ड्युटीवर असताना त्या प्रवाशांची तिकिटे तपासत होत्या. एका प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर या मार्गासाठी द्वितीय श्रेणीचे तिमाही सीझन तिकीट क्रमांक UFV-291148415 दाखवले, जे २०.०८.२०२५ ते १९.११.२०२५ या कालावधीसाठी वैध होते.

शंका आल्याने श्रीमती सुजाता यांनी प्रवाशाला सीझन तिकीट कुठे काढले आहे याबाबत चौकशी केली. प्रवाशाने तिकीट मस्जिद स्थानकावरून काढल्याचे सांगितले, परंतु दाखवलेल्या सीझन तिकिटावर जारी केलेल्या स्थानकाचे नाव भायखळा असे नमूद होते. पुढील चौकशीदरम्यान प्रवाशाने आपले नाव शमिन शेख असल्याचे सांगितले, तर सीझन तिकिटावर नाव मोहम्मद दिलशाद असे होते.

श्रीमती सुजाता यांना तात्काळ सीझन तिकीट बनावट असल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आणि त्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले तसेच एफआयआर नोंदवण्यात आला.

पुढील कारवाईसाठी गुन्हेगाराला जीआरपी/ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सोपवण्यात आले आहे.

श्रीमती सुजाता यांच्या सतर्कता आणि चातुर्यपूर्ण कृतीमुळे बनावट तिकीट रॅकेटचा भांडाफोड झाला असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेने इतरांसाठी अनुकरणीय असा आदर्श निर्माण केला आहे.

मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन केले आहे की, कृपया वैध तिकिटांसहच प्रवास करावा आणि तिकिटे अधिकृत विक्रेते, काउंटर किंवा ऑनलाइन माध्यमांतूनच काढावीत.