भुसावळ, ( प्रतिनिधी ) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा काँग्रेस) पक्षाने भुसावळ नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सविता प्रवीण सुरवाडे (वय ३२, शिक्षण – बी.ए. पदवीधर, राहणार कला नगर, भुसावळ) यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या घोषणेमुळे भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ‘अ’ नगरपरिषद असलेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आता चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सौ. सविता सुरवाडे या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा भुसावळमधील ज्येष्ठ नेते ॲड. प्रवीण नाना सुरवाडे यांच्या पत्नी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ॲड. प्रवीण नाना सुरवाडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी केलेल्या निष्ठावंत पक्षकार्याचा , संघटनेच्या मजबूतीकरणासाठी केलेल्या परिश्रमाचे फळ असून, भुसावळ शहरात केलेल्या समाजकार्यातून मिळालेल्या लोकप्रियतेचा सन्मान म्हणून पक्षाने त्यांच्या सौभाग्यवतींना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान केला आहे, असे ॲड प्रविण नाना सुरवाडे यांनी ‘मिडियामेल’ न्युज शी बोलताना सांगितले.
दरम्यान, काल भुसावळ शहरातील एका ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते तथा माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी (१६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदासाठी आपल्या पक्षातर्फे स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची जोरदार घोषणा केली होती. मात्र आता काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार दिल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आलेले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांना बद्दल 60,000 मते मिळालेली होती. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत भुसावळमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काँग्रेसच्या या निर्णयामुळे एकीकडे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या घोषणेमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



