भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. रजनी संजय सावकारे यांचा अर्ज दाखल,

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा आखाडा रंगला असतानाच शुक्रवार, 14 रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती सौ. रजनी संजय सावकारे यांनी महिला समर्थकांसह भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केला. रजनीताई याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील हे निश्चित आहे तर दुसरीकडे प्रमुख लढत असलेल्या महाविकास आघाडीने सहा उमेदवारांची नावे जाहीर केली असलीतरी नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. आज शुक्रवार रोजी 11 नामनिर्देशांक पत्र दाखल झाले आहे

उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यावेळी अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून आरक्षित जागा जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच सर्वात प्रमुख दावेदार म्हणून विद्यमान आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती असलेल्या आणि प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून भुसावळ शहरासह तालुक्यात महिलांच्या हितासाठी विविध प्रकारचे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम राबविणाऱ्या सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या सौ. रजनी संजय सावकारे यांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय ,भुसावळ येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपल्या उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे.

.यावेळी डॉ. संगीता बियाणी, डॉ. मृणाल पाटील, माजी नगरसेविका मीना लोणारी, माजी नगरसेविका प्रीतमा गिरीश महाजन, सोनल महाजन, प्रीती कोलते, मंगला पाटील, प्रीती मुकेश पाटील आदींची उपस्थिती होती.. .
दरम्यान , नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळी त्यांनी गळ्यात भारतीय जनता पक्षाचा गमछा घातलेला होता. यामुळे भुसावळ शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले असून, भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म मिळण्याची दाट शक्यता असल्याच्या कारणावरून नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार्‍या सौ रजनी संजय सावकारे या एकमेव उमेदवार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी दावेदारी करून ,विविध चर्चांना उधाण आणले होते. आता त्यांच्या विरोधात कोणकोणत्या राष्ट्रीय पक्षांकडून उमेदवार उभे केले जातात, याकडे भुसावळ शहरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.