दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाल्याने 10जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सुरुवातीला हा सिलिंडर स्फोट असल्याचे बोलले जात होते मात्र नंतर स्फोट गंभीर असल्याचं समोर आले आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून या स्फोटानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अचानक झाला स्फोट
सोमवार, 10 रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारचा अचानक स्फोट झाला. आग इतक्या वेगाने पसरली की जवळच उभ्या असलेल्या तीन कारही जळून खाक झाल्या.
या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, स्फोटाचे कारण तपासले जात आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनास्थळी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले असून फॉरेन्सिक टीमही या ठिकाणी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम केले जात आहे.


