रावेर लोकसभेतील पालिका निवडणुका अजित पवार गट स्वबळावर लढणार : भुसावळात मंत्री माणिकराव कोकाटे

-पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपानंतर अजित पवारांची केली पाठराखण : म्हणाले, चुकीच्या कामांना दादांचा नेहमीच विरोध !

भुसावळ (प्रतिनिधी ) – रावेर लोकसभा क्षेत्रातील निवडणुकांची पक्षाकडून चाचपणी सुरू असून सर्वच ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असून जेथे आम्ही कमी पडू तेथे युतीबाबत विचार करू मात्र स्वबळावर निवडणुका लढण्याची आमची तयारी असल्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुसावळात माध्यमांशी बोलताना सांगितले. पुणे जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या अजित पवारांची पाठराखण त्यांनी करीत अजितदादांचा चुकीच्या कामांना पाठींबा कदापि नसतो मात्र चौकशीत सत्य समोर येईल, असे सूचक सुतोवाचही त्यांनी केले.

भुसावळात इच्छुकांच्या मुलाखती
भुसावळातील संतोषी माता सभागृहात सोमवार, 10 रोजी रावेर लोकसभा क्षेत्रातील आठ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंत्री कोकाटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. मुलाखती आटोपल्यानंतर मंत्री कोकाटे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, सर्वच ठिकाणी उमेदवारांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आम्ही उमेदवार उभे करू तसेच जेथे आमची ताकद कमी पडेल तेथे युतीबाबत निर्णय जिल्हाध्यक्ष घेतील.

अजित पवारांची केली पाठराखण
पुणे जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचे नाव आल्यानंतर अजित पवारांच्या अडचणी वाढल्या असून याकडे कसे पाहता? या प्रश्नावर मंत्री कोकाटे म्हणाले की, हे सर्व विरोधकांचे बेछूट आरोप आहे. मतदारांना अजित पवारांचा स्वभाव माहित आहे. ते कुठलेही चुकीचे काम नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठीत केले असून त्यात सत्य समोर येईल, असे सांगून त्यांनी अजित दादांसह पार्थ पवारांची पाठराखण केली.

यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, अमळनेर आमदार अनिल भाईदास पाटील, प्रदेश प्रवक्ता प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, विवेक ठाकरे आदींची उपस्थिती होती.