नगरपालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर माजी खासदार हिना गावीत यांची पुन्हा ‘भाजपात’ एंट्री –

मुंबई (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर असतानाच नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावीत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश करीत खळबळ उडवनू दिली आहे. त्यांच्यासोबत अक्कलकुवा आणि तळोदा मतदारसंघांमधील शेकडो कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांनीही भाजपात प्रवेश केला. मुंबईत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

विधानसभेला उमेदवारी न दिल्याने भाजपा सोडली
हिना गावीत या 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी हिना गावीत यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने डॉ.हिना गावीत यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्या उभ्या राहिल्या मात्र विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.