माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी धाडसी चोरी; शहरात खळबळ ​ ; बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने लांबवला ऐवज ​

मुक्ताईनगर (| प्रतिनिधी)

​जळगाव शहरात चोरट्यांच्या वाढत्या घटनांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या शासकीय निवासस्थानी धाडसी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

उच्चपदस्थ राजकीय नेत्याच्या घरीच हा प्रकार घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांच्या घरांनाही सुरक्षेची हमी उरली नाही, अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवरामनगर परिसरातील ‘मुक्ताई’ बंगला दिवाळीच्या सुटीनिमित्त बंद होता. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे या काळात मुक्ताईनगर येथील निवासस्थानी वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचले असता, त्यांना मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सर्व सामान विखुरलेल्या अवस्थेत आढळले, ज्यामुळे चोरी झाल्याची खात्री पटली.

​या घटनेची माहिती मिळताच खडसे यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काही मिनिटांतच पोलिस अधिकारी आणि गुन्हे शोध पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे.

​दरम्यान, या चोरीत नेमके किती मौल्यवान ऐवज लंपास झाला आणि किती आर्थिक नुकसान झाले, याची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, काही महत्त्वपूर्ण मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीस गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
​माजी मंत्र्यांच्या घरावरच चोरीचा हात साफ झाल्यामुळे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानाची ही अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने माग काढण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, कसून तपास सुरू आहे.