भुसावळ : (प्रतिनिधी) : साकेगावातील प्रौढाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. फुलगाव उड्डाणपुलाखाली ही घटना गुरुवार, 23 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. सुनील शंकर कुंभार (45) असे मृताचे नाव असून ते वीटभट्टी व्यावसायीक असल्याचे सांगण्यात आले.
सुनील कुंभार हे आपल्या मोटारसायकलने (एम.एच.19 ई.ई.5773) ने फुलगावकडे जात असताना समोरून येणार्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलने भरधाव वेगात सुनील यांच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. या धडकेत सुनील गंभीर जखमी झाले. गावकर्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, वरणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी सुनील कुंभार यांना दाखल होण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुनील कुंभार यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील कुंभार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


