भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील शिरपूर-कन्हाळा रोड परिसरातील अमृत कॉलनीतील 15 वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी घडली. लावण्या मुकेश अंभोरे (15) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
गुरुवारी सायंकाळी मृत विद्यार्थिनीचे आई-वडील बाजारात गेले असता घरात दोन्ही मुली होत्या. सुमारे सायंकाळी सात वाजता ते घरी परतल्यानंतर मोठी मुलगी लावण्या हिने घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तत्काळ तिला खाली उतरवून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे .


