शिर्डी – श्रद्धा व सबुरीचा संदेश देणार्या शिर्डीतील साई संस्थानमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्युत विभागामध्ये 77 लाख 14 हजार रुपयांच्या साहित्याचा अपहार झाल्याने संस्थानच्या 47 विद्यमान, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी पोलिसांत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल करण्यात आली
संजय काळे (कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा अपहार 2017 ते 2023 या कालावधीत झाला आहे. संस्थानच्या विद्युत विभागातील डेड स्टॉक रजिस्टरमध्ये बनावट नोंदी करून आणि साहित्याची नोंद न ठेवता आरोपींनी संगनमताने ही चोरी केली. यापूर्वी 23 मे 2022 रोजी केवळ 22 हजार 500 रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत सांगितले की, संस्थानच्या विद्युत विभागात सन 2017 ते 2023 दरम्यान सुमारे 51.62 लाखांच्या साहित्याची अनियमितता झाल्याचे शासनमान्य लेखा परीक्षणात स्पष्ट झाले.



